पुणे शहर व जिल्ह्यातील ४८ दुय्यम निबंधक केंद्रे संलग्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता यावा यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा “एक राज्य, एक नोंदणी” हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला. त्यानंतर आता १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही तो राबविण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण ४८ दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावांतील दस्त नोंदविता येणार आहे.
राज्यात सध्या एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयांमध्ये केली जाते. अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुसऱ्या जिल्ह्यात जमीन किंवा घर खरेदीचे व्यवहार करतात.
अशा खरेदीदारांना संबंधित जिल्हा सहनिबंधक कार्यालयात जाऊन व्यवहार पूर्ण करावा लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने “एक राज्य, एक नोंदणी” हा उपक्रम सुरू केला आहे.
पुणे शहरात २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत, तर जिल्ह्यात २१ कार्यालयांमधून दस्त नोंदणी केली जाते. या सर्व ४८ कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे, पुणे शहरातील खरेदीदाराने जुन्नर तालुक्यातील जमीन खरेदी केल्यास त्याला दस्त नोंदणीसाठी तेथील कार्यालयात न जाता पुण्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार आहे.
तसेच, जिल्ह्यातील गावांमधील कोणीही पुणे शहरात सदनिका घेतली, तर त्याला दस्त नोंदणीसाठी पुण्यात येण्याची गरज नाही. तो आपल्या जवळच्या निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करू शकणार आहे.
दस्त नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आय-सरिता १.९ या प्रणालीच्या माध्यमातून “एक राज्य, एक नोंदणी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. – अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक
