७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : किरकोळ कारणावरून पिंपरी गावात भांडण झाले. त्यात दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, आणि पोलिसांनी दोघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना १९७७ सालची आहे. या खटल्याचा निकाल तब्बल ४८ वर्षांनंतर, २०२५ मध्ये देण्यात आला.
त्यावेळी तरुण असलेले दोघा आरोपींनी आता वयाची सत्तरी पार केली आहे. त्यांचे वय पाहून न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. ४८ वर्षांनंतर निकाल लागलेला हा पुण्यातील पहिला खटला असावा. दिलीप नंदलाल शर्मा आणि किशोर नंदलाल शर्मा अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांना ३ दिवस साधी कैद व ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून हा खटला तब्बल १२ वर्षांनी, म्हणजेच १९८९ मध्ये, फौजदारी खटला म्हणून दाखल झाला होता.
या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती, परंतु आरोपी न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले की, यापूर्वी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती.
मात्र, आरोपी खटल्याच्या तारखांना हजर राहत नसल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महाडिक यांनी दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावली.
