देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचा निर्णय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट आंब्यांची विक्री थांबवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे देवगड हापूस आंब्याला भौगोलिक संकेत (GI टॅगिंग) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅपर-प्रूफ युआयडी (UID) कोड असेल. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे स्टिकर लावणे बंधनकारक असेल. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक ओंकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देवगड तालुक्यातील हापूस आंबा हा त्याच्या विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे.
मात्र, सध्या देवगड हापूसच्या नावाखाली बाजारात विक्री होणाऱ्या सुमारे ८० टक्क्यांहून अधिक आंबे हे देवगडमधील नाहीत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
बनावट देवगड हापूस आंब्याची विक्री थांबवणे हा या निर्णयाचा प्रमुख उद्देश आहे.
या प्रकल्पासाठी टीपी सील युआयडीचे पेटंट असलेल्या मुंबईतील सन सोल्युशन या संस्थेबरोबर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने करार केला आहे. जीआय नोंदणी नसलेले आणि स्टिकर नसलेले आंबे कोणीही विक्री करताना आढळल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
आंबा देवगडचाच आहे का, हे तपासण्यासाठी ग्राहकांनी ९१६७६६८८९९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आंब्याचे आणि त्यावरील स्टिकरचे छायाचित्र पाठवावे. ही प्रणाली त्या स्टिकरवरील कोड वाचते आणि स्टिकरवरील क्रमांक पाठवण्यास सांगते.
स्टिकर काढल्यावर तो आपोआप दोन भागांमध्ये विभागला जातो. जर व्हॉट्सअॅपद्वारे मिळालेला संपूर्ण कोड युआयडी प्रणालीतील कोडशी जुळला, तर ग्राहकाला शेतकरी, विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, जीआय नोंदणी क्रमांक आदी तपशील मिळतील. या पडताळणी प्रक्रियेमुळे देवगड हापूसची विश्वसनीयता वाढेल, असे ओंकार सप्रे यांनी सांगितले.
