तब्बल ६३ गुन्हे दाखल : नागपूरला एक वर्षासाठी जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आतापर्यंत तब्बल ६३ गुन्हे दाखल असलेल्या मटका किंग नंदकुमार नाईक याच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२, रा. शुक्रवार पेठ) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. नंदकुमार नाईक याचे अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे असून, गेली अनेक वर्षे तो हे अड्डे चालवत आहे.
त्यामुळेच त्याला मटका किंग म्हटले जाते. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ६३ गुन्हे दाखल आहेत. २०२१ पासून खडक पोलीस ठाण्यात त्याच्यावर अवैध मटका व जुगाराचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या मटका अड्ड्यांवर वेळोवेळी छापा टाकून कारवाई केली, तरी त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. तसेच, त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. त्याच्या अवैध जुगार अड्ड्यांमुळे पुणे शहरातील रोजंदारीवर काम करणारे तरुण, नोकरदार तसेच आसपासच्या परिसरातील तरुण जुगाराच्या व्यसनात अडकले होते.
त्याच्या अशा कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याच्या शुक्रवार पेठेतील जुगार अड्ड्याच्या इमारतीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून ती पाडण्यात आली. तरीही त्याचे जुगार अड्डे बंद झाले नाहीत.
त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून त्याला नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार खडक पोलिसांनी नंदकुमार नाईक याला स्थानबद्ध केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम, पोलीस हवालदार संतोष थोरात, पोलीस अंमलदार चंद्रशेखर खरात, ईरफान नदाफ यांनी केली आहे.
