आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जादा परताव्याच्या आमिषाने साडेनऊ कोटींला गंडा

Spread the love

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास म्युच्युअल फंडापेक्षा अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून इक्विटी ट्रेडचा प्रोफेशनल ट्रेडर आणि ट्रेनरने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांना गंडा घातला. त्याने आपले कार्यालय बंद करून फरार झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी एका ५७ वर्षीय नागरिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश रामगुलाब कुमार ऊर्फ राज कोटारिया आणि वंदना भीमराव शिरसाट (रा. डीएसके विश्व, धायरी) यांच्यावर ठेवीदारांच्या वित्तीय संस्था हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ ऑक्टोबर २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कोटारिया याने आपण प्रोफेशनल ट्रेडर आणि ट्रेनर असल्याचे सांगून, माझ्या सांगण्यानुसार शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास म्युच्युअल फंडापेक्षा अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादीने त्याच्याकडून शेअर बाजाराचे प्रोफेशनल प्रशिक्षण घेतले आणि त्याने सुचवल्याप्रमाणे गुंतवणूक करत गेले.

फिर्यादीने ऑनलाइन पद्धतीने आरोपींच्या बँक खात्यांवर वेळोवेळी २१ कोटी ५० लाख रुपये पाठवले. त्यापैकी फिर्यादीला १३ कोटी ८ लाख ६० हजार रुपयांचा परतावा मिळाला. मात्र, ऑक्टोबर २०२३ नंतर परतावा देणे थांबवण्यात आले. चौकशी केल्यावर, कोणीतरी तक्रार केल्याने सेबीने निर्बंध आणले असून मार्च २०२४ नंतर संपूर्ण परतावा दिला जाईल, असे आरोपीने सांगितले.

मात्र, मार्च २०२४ मध्ये फिर्यादी त्याच्या कार्यालयात गेले असता, ते बंद होते. आरोपी सर्व सामान घेऊन पळून गेल्याचे समोर आले. फिर्यादीचे ८ कोटी ४१ लाख ४० हजार रुपये आणि अन्य दोन गुंतवणूकदारांचे १ कोटी ९ लाख ४ हजार रुपये असे एकूण ९ कोटी ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करून राज कोटारिया फरार झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस या प्रकरणाचा तपास करत आहेत.