आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शिक्षण संस्थाचालकाकडे मागितली २५ लाखांची खंडणी

Spread the love

पुणे : “तुमचा मुलगा आणि महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हे व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल,” असे धमकावणाऱ्या शिक्षण संस्थेच्या माजी कर्मचारीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

सुदर्शन कांबळे (रा. धायरी फाटा) असे या माजी कर्मचारीचे नाव आहे. तो या शिक्षण संस्थेत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. मात्र, कोरोनाकाळात त्याने येथील नोकरी सोडली होती. हा प्रकार ६ मार्चपासून सुरू होता.

या प्रकरणी शिक्षण संस्थाचालकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ६ मार्च रोजी सुदर्शन कांबळे शिक्षण संस्थेच्या आवारात आला आणि संस्थाचालकांच्या मोबाईलवर संदेश पाठवला.

“तुमचा मुलगा आणि एक महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हे व्हिडिओ ८०० पेनड्राइव्हमध्ये देऊन संस्थेची बदनामी करीन. हे वृत्त प्रसारित होऊ नये, असे वाटत असेल, तर २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल,” अशी धमकी त्याने दिली.

त्यानंतर त्याने वारंवार फोन व मेसेज करून खंडणीची मागणी केली. अखेर संस्थाचालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. सिंहगड रोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून त्याचे लोकेशन निश्चित केले आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण करीत आहेत.