उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वित्तीय संस्थांकडून ५० कोटींची खरेदी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जरोखे (बाँड) वितरणास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी, पहिल्याच दिवशी वित्तीय संस्थांकडून ५० कोटी रुपयांच्या रोख्यांची खरेदी करण्यात आली.
एकेकाळी तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषांचे पालन केल्यामुळे, देशातील राज्य सहकारी बँकांच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस ५०० कोटी रुपयांच्या रोखे वितरणास अनुमती मिळाली आहे. राज्य बँकेच्या मुख्यालयात या रोखे वितरणाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
यावेळी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नॅफस्कॉबचे कार्यकारी संचालक भीमा सुब्रमण्यम आदी उपस्थित होते. राज्य सहकारी बँकेने वितरित केलेले रोखे दहा वर्षांच्या मुदतीचे आहेत. त्यावर द. सा. द. शेकडा ८.५० टक्के दराने परतावा मिळणार आहे.
या रोख्यांमध्ये बँकांना गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. मात्र, सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, ट्रस्ट, कंपन्या आणि व्यक्तिगत गुंतवणूकदार यांना त्याचा लाभ घेता येईल. या रोख्यांमध्ये गुंतवणूक केल्यास, पतसंस्थांना वैधानिक तरलतेसाठी त्यांची गणना करता येईल. तसेच, सहकारी संस्थांना प्राप्तिकर कायद्यातील कलम ८०(पी) नुसार व्याजावर सवलत मिळेल.
हे कर्जरोख्यांसाठीचे अर्ज बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहेत. बँकेने वितरित केलेले रोखे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ३० जून २०२५ या मुदतीपूर्वी खरेदी करता येणार आहेत.
