आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जिल्ह्यात दुबार असलेली नावे मतदार यादीतून काढणार

Spread the love

पुणे : जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांच्या मतदार याद्यांमध्ये असलेली दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यासंबंधी माहिती घेतली जाईल आणि मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

मतदार याद्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात अचानक लाखो मतदार कसे वाढले, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अनेक मतदारांची नावे शहरातील तसेच गावाकडील मतदार यादीत असतात, त्यामुळे ते दोन्ही ठिकाणी मतदान करतात. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शहरातील मतदारांना मतदानासाठी गावाकडे नेले जाते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येतील आणि एकाच मतदार यादीत नाव राहील. मतदार याद्यांमधून मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी, मृत व्यक्तींच्या अभिलेख नोंदींच्या याद्या तपासून त्यानुसार नावे कमी करण्यात येतील.

तसेच, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांसंबंधी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) मार्फत सर्वेक्षण करून मतदार याद्यांमध्ये सुधारणा केली जाईल. या कामासाठी प्रशासनातर्फे बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल.

मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झालेल्या नावांसंदर्भातही सुधारणा केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.