आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश

Spread the love

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना त्यांच्या संपूर्ण माहितीची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यास त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे असणे आवश्यक आहे.

त्यानुसार, घरमालकांनी भाडेकरूंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, भाडे करारनामा, ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करावीत.

भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यास घरमालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय कारवाई केली जाऊ शकते. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.