महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : वाशी तालुक्यातील पारगाव येथे गेल्या सतरा वर्ष्यांपासून 23 मार्च शहीद दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला मोलाचा सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिराचे आयोजन संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ करण्यात येते. शिबिराची सुरुवात या थोर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
कार्यक्रमास माजी सरपंच डी.एन. मोटे, डॉ. चंद्रशेखर कोकणे, उपसरपंच पंकज चव्हाण, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सारंग मोटे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आखाडे, शाखा प्रमुख बालाजी गिराम, तसेच अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेष म्हणजे, महिलांनीही रक्तदान करून समाजात प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. जयश्री माने, कल्पना कोकाटे, राणी खवले, अलका काटवटे आणि उंदरे मॅडम यांनी या शिबिरात भाग घेतला. रक्त संकलन बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या माध्यमातून करण्यात आले.
या उपक्रमामुळे शहीद दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या सतरा वर्ष्यांची परंपरा अबाधित ठेवत पुढील वर्षीही अधिक रक्तदात्यांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
