सुपर बिबवेवाडीतील महादेव वडेवाले दुकानातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडापाव फुकट न दिल्याने दुकानातील आचाऱ्याला “मी इथला भाई आहे” अशी धमकी देऊन खिशातील २२०० रुपये जबरदस्तीने काढून लुटणाऱ्या गुंडाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
भारत बडगुजर (वय ३७, रा. दुर्गामाता गार्डनजवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत मोहन परमार (वय ४९, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ते महादेव वडेवाले या दुकानात आचारी म्हणून काम करतात. ६ मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजता ते दुकान बंद करत असताना भारत बडगुजर आला. त्याने “मला फुकट वडापाव दे” असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली. “तुझ्या मालकाला बोलावून घे” असे बोलून तो निघून गेला.
थोड्या वेळाने तो परत आला आणि म्हणाला, “तुला आणि तुझ्या दुकानमालकाला लई माज आला आहे का? तुमचा माज जिरवतो. मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का? मला वडापाव देत नाहीस का?” असे बोलून त्याने त्यांना धक्काबुक्की केली आणि खिशामधून धंद्याचे २२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
“मी जेव्हा जेव्हा येईन, तेव्हा मला वडापाव तयार ठेव. जर माझ्या मनाप्रमाणे वागला नाहीस, तर तुझा गेम करीन”, अशी धमकी देऊन तो निघून गेला. बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता, मात्र तो मिळून येत नव्हता.
पोलीस अंमलदार ताकपेरे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, भारत बडगुजर हा सुखसागरनगरमधील अंबा माता मंदिर येथे आला आहे. त्यानुसार, पोलिसांनी तेथे जाऊन भारत बडगुजर याला पकडले. जबरी चोरी करून लुबाडलेले पैसे मौजमजेसाठी खर्च केल्याचे त्याने कबूल केले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार ज्योतिष काळे, रक्षित काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील आणि दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.
