आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १ कोटी ४४ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : शासकीय ठेक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची १ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य संशयित सत्यम जोशी हा एक वर्षांपूर्वी दुबईला पळून गेल्याचे सांगण्यात येते. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सांगवी आणि वानवडी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सत्यम जोशी, देविका सत्यम जोशी, राहुल एरंडवणे, हर्षल चौधरी, कुलदीप कदम आणि वैभव इंगवले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे कार्यालय फर्ग्युसन रोडवर होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील औंध रोड परिसरात राहतात. फिर्यादी आणि आरोपींची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी, “आमच्या कंपनीला शासकीय कामाचा ठेका मिळाला आहे.

या कामात गुंतवणूक केल्यास दरमहा ६ ते १२ टक्के व्याज देण्यात येईल,” अशी बतावणी केली. त्यानंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी १ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये घेतले. महिलेनं पैसे गुंतवल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आली.

मात्र, त्यानंतर परतावा थांबवण्यात आला. महिलेनं गुंतविलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला.

जवळपास एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले करत आहेत.