आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पबमध्ये महिला बाऊन्सरचा विनयभंग

Spread the love

पुणे : पबमधील डान्स फ्लोअरवर डान्स करत असताना ते डान्स करणार्‍या इतर तरुणींना धक्का मारत होते. ही बाब लक्षात घेऊन महिला बाऊंसरने त्यांना बाजूला डान्स करायला सांगितल्याच्या रागातून दोघांनी महिला बाऊन्सरला अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गणेश दादाभाऊ घावटे (वय ३४, रा. मु. पो. अण्णापूर, ता. शिरुर) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला बाऊन्सरने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना इर्शान्य मॉलमधील हॉटेल किग्जमध्ये शनिवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य मॉलमध्ये हॉटेल किग्ज हा पब आहे. या पबमध्ये मध्यरात्रीनंतरही अनेक तरुण तरुणी डान्स फ्लोअरवर डान्स करत होते.

त्यात गणेश आणि यश हे दोघेही डान्स करताना तेथे डान्स करत असलेल्या इतर तरुणींना धक्का लावत होते. हे पाहून तेथील महिला बाऊन्सर यांनी या दोघांना बाजूला डान्स करायला सांगितले. तेव्हा या दोघांनी या महिला बाऊन्सरला अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.