वाहने विकत घ्यायला लावून केली विल्हेवाट, सात जणांवर गुन्हा, तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध बनावट कंपन्या स्थापन करून त्यामध्ये गुंतवणूक करायला लावले. तसेच, भाडे तत्त्वावर वाहने घेऊ, असे सांगून लोकांना कार, दुचाकी, जेसीबी अशी वाहने खरेदी करण्यास भाग पाडले. ही वाहने भाडे तत्त्वावर घेतल्यानंतर परस्पर विकून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ११० लोकांची २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. याबाबत ज्ञानेश खंडु शिंदे (वय २४, रा. अवसरी बु., ता. आंबेगाव) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संकेत सुधीर थोरात (वय ३०, रा. हांडेवाडी), सोनू नवनाथ हिंगे (वय २९) आणि रिजवान फारुख मेमन (वय ४४, रा. गणेश पेठ) यांना अटक केली आहे.
तसेच, प्रणय उदय खरे (वय ३२), वृषाली संतोष रायसोनी (वय २४, रा. बिबवेवाडी) आणि विजय चंद्रकांत आशर (वय ६५, रा. इस्कॉन मंदिराजवळ, टिळेकरनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वानवडीतील जगताप चौक येथील सेक्रेड वर्ल्ड इमारतीमधील शॉपमध्ये ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या परिचयाचे सोनू हिंगे यांनी त्यांना सांगितले की, तो बायोफिक्स प्रो कंपनीचा व्हेंडर आहे. कंपनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करते. कंपनीला जेसीबीची आवश्यकता असून, ती भाडेतत्त्वावर घ्यायची आहे.
कंपनीला जेसीबी वापरण्यास दिल्यास भाड्यापोटी दरमहा १ लाख ३० हजार रुपये मिळतील, तसेच जीएसटी कंपनीच पुढील सात वर्षे भरणार आहे. ही स्कीम चांगली वाटल्याने फिर्यादींनी १४ डिसेंबर २०२४ रोजी ३९ लाख रुपयांना जेसीबी खरेदी केला.
दुसऱ्या दिवशी तो बायोफिक्स प्रो कंपनीला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिला. जानेवारी २०२५ मध्ये त्यांना केवळ ६० हजार रुपये भाडे मिळाले. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात आली नाही. त्यांचा जेसीबी कुठे आहे, हेही आरोपी सांगत नव्हते. त्यांनी शोध घेतल्यावर तो उंड्री येथील गोदामात सापडला. त्याच्यासोबत अशीच अनेक वाहनेही होती.
त्यांनी रिजवान मेमन यांना विचारणा केली असता, त्यांनी दर्पण ठक्कर यांच्या मध्यस्थीने अनेक जेसीबी आणि पोकलँड खरेदी केल्याचे सांगितले. अधिक चौकशीत आरोपींनी बायोफिक्स प्रो ग्लोबल, मुफेडको, म्युफ्याको आणि भारत इंडस्ट्रीज कंपनी यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांना चांगले भाडे देण्याचे आमिष दाखवून गाड्या खरेदी करायला लावल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ठरलेली भाडे रक्कम न देता काही वाहने परस्पर विकली, काही गाड्यांचे सुटे भाग बाजारात भंगारात विकले, तर काही गाड्या गायब केल्या.
या प्रकारात १५० हून अधिक गुंतवणूकदार आहेत. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी अनेकांना कार, छोटा हत्ती, टेम्पो, जेसीबी, ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर मशीन खरेदी करायला लावले.
सोनू हिंगे व संकेत थोरात यांच्या सांगण्यावरून ही वाहने कंपनीकडे भाडेतत्त्वावर दिली गेली. मात्र, त्याचे भाडे मिळाले नाही, उलट वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून तब्बल २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव तपास करत आहेत.
