इन्कोफिना कन्सल्टंट कंपनीचे संचालक फरार, कोथरुड, चतु:श्रृंगी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा अडीच ते चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून इन्कोफिना कन्सल्टंट एलएलपीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून बांधकाम ठेकेदाराला १ कोटी ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोथरुड पोलिसांनी इन्कोफिना कन्सल्टंट एलएलपीचे संचालक अमर बिरादार आणि ज्ञानेश्वरी अमर बिरादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्यावर चतु:श्रृंगी आणि डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वीच अनेकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. हे दाम्पत्य गेल्या वर्षभरापासून बाणेर येथील कार्यालय बंद करून पसार झाले आहे.
याबाबत एका ५० वर्षीय बांधकाम ठेकेदाराने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरादार दाम्पत्याशी बांधकाम ठेकेदाराची २०१९ मध्ये औंध भागातील एका कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींशी त्यांचा परिचय वाढला. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात इन्कोफिना कन्सल्टिंग कंपनी सुरू केल्याचे बिरादार दाम्पत्याने ठेकेदाराला सांगितले.
“कंपनीत दहा लाख रुपये गुंतविल्यास दरमहा अडीच ते चार टक्के परतावा मिळेल, तसेच मूळ रक्कम अडीच वर्षांत परत केली जाईल,” असे आमिष बिरादार दाम्पत्याने दाखवले. त्यानंतर ठेकेदाराने काही रक्कम गुंतवली. प्रारंभी आरोपींनी ठेकेदाराला परतावा दिला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
यानंतर ठेकेदाराच्या भाच्याने आणि पतीनेही बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक केली. त्या वेळी आरोपींनी दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. ठेकेदाराने त्याच्या वडिलांच्या आणि आईच्या नावानेही अधिक रक्कम गुंतवली. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. रक्कम कमी प्रमाणात मिळू लागल्यानंतर ठेकेदाराला संशय आला. त्यांनी बिरादार दाम्पत्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालय बंद करून ते पसार झाल्याचे लक्षात आले.
पुण्यात फक्त आरोपींचे वडील आणि भाऊ राहतात. ज्ञानेश्वरी आणि अमर बिरादार यांच्याबाबत ते काहीही माहिती देत नसल्याचे फिर्यादीने सांगितले. या दाम्पत्याने आणखी एका गुंतवणूकदाराची ८६ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा गेल्या महिन्यात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
