मालकाच्या चालकानेच मित्राच्या मदतीने केले कृत्य; खडकी पोलिसांनी ६ तासांत आरोपींना मुद्देमालासह केले गजाआड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चाकणहून येऊन एका ज्वेलर्सच्या दुकानात पैसे देण्यासाठी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने भरदिवसा सर्वांसमोर चोरून नेली. खडकी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोघा आरोपींना अटक करून चोरलेले १० लाख रुपये हस्तगत केले.
चेतन मंगेश गोडसे (वय २८) आणि आकाश कैलास माळी (वय २५, दोघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आकाश माळी हा सुशील गोयल यांच्याकडे वाहनचालक म्हणून कार्यरत होता. त्याने चेतन गोडसेच्या मदतीने ही जबरी चोरी घडवून आणली.
या प्रकरणी अमीर युसुफ सय्यद (वय ६६, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार येथील श्री महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमीर सय्यद हे चाकण येथील सुशील गोयल यांच्याकडे कामाला आहेत. त्यांना खडकीतील एका व्यक्तीस देण्यासाठी १० लाख रुपये दिले होते. हे पैसे घेऊन ते पुण्यात आले.
त्यांच्याकडे एक हॅंडबॅग होती. दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी ते श्री महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर पायी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील १० लाख रुपयांची बॅग हिसकावून नेली. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता आणि त्यांच्या व्हेस्पा स्कूटरला नंबर प्लेट नव्हती.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनांचे तंतोतंत पालन करून तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग काढला.
अवघ्या ६ तासांत आरोपींना चाकण येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेले १० लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. आकाश माळी हा सुशील गोयल यांच्याकडे वाहनचालक म्हणून कार्यरत होता.
त्याला माहिती होते की, अमीर सय्यद यांच्याकडे खडकी बाजार येथे देण्यासाठी १० लाख रुपये आहेत. त्यामुळे त्याने सय्यद यांच्यावर पाळत ठेवली व त्यांच्या हालचालींची माहिती चेतन गोडसेला दिली. त्यानंतर चेतन गोडसेने सय्यद यांच्या हातातील बॅग हिसकावून नेली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, तसेच पोलीस अंमलदार संदेश निकाळजे, आशिष पवार, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, सुधाकर तागड, दिनेश भोये, शशांक डोंगरे आणि प्रताप केदारी यांनी सहभाग घेतला.
