लष्कर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चोराच्या आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दरवाजाला कुलूप न लावता, फक्त पडदा ओढून मुलीच्या घरी बाळाला अंघोळ घालण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्या दरम्यान, चोरट्याने घरात शिरून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. लष्कर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चोरट्याला पकडले. त्याने स्वतःच्या मावशीच्या घरातच चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
किरण राजेश कुंटे (वय २८, रा. धोबी घाट, कॅम्प) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सीमाचंदन मकनुर (वय ४०, रा. पी. बी. क्वॉर्टर, पुना कॉलेजसमोर, धोबी घाट) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी २४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्या दरम्यान, चोरटा घरात शिरला आणि त्याने लोखंडी कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र, दोरले, कर्णफुले, अंगठी आणि १० हजार रुपये असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
फिर्यादी साडेचार वाजता परत आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. लष्कर पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना, परिसरातील लोकांनी या दीड-दोन तासांच्या कालावधीत किरण कुंटे हा त्या परिसरात फिरताना दिसल्याचे सांगितले.
तसेच, सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो परिसरात आढळला. फिर्यादींनी याच्याबाबत विचारणा केली असता, त्यांनीही त्याच्यावर संशय व्यक्त केला. mपोलिसांनी किरण कुंटे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तो घरी पाणी पिण्यासाठी आला असता, त्याला मावशीच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने गुपचुप घरात प्रवेश करून, लोखंडी कपाट उघडून त्याच्या ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये चोरले.
पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही कामगिरी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदीप उकिरडे, प्रविण गायकवाड, लोकेश कदम, सागर हराळ आणि अलका ब्राह्मणे यांनी केली.
