सायबर चोरट्यांचा नवा फंडा : अकाऊंटंटला सायबर चोरट्यांचा गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांनी आता नवीन फंडा शोधल्याचे समोर आले आहे. या नव्या प्रकारात सायबर चोरट्याने एका अकाउंटंटलाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही फसवणूक असल्याचे त्यांना वेळीच लक्षात आल्याने सायबर क्राईम विभागाने तातडीने कारवाई करत त्यांची रक्कम फ्रीज केली, त्यामुळे त्यांचे नुकसान टळले.
याबाबत कोंढव्यात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय अकाउंटंटने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फॉरेन करंन्सी ट्रेडिंगद्वारे अधिक नफा कसा मिळवता येईल, याचा शोध घेत असताना त्यांना टेलिग्रामवर “अमित ट्रेडर/ट्रेडिंग” नावाची वेबसाइट दिसली.
त्यांनी संपर्क साधल्यावर वेगवेगळ्या देशातील करंन्सी खरेदी-विक्री प्रक्रियेची माहिती देण्यात आली. चोरट्यांनी “QX Broker” या अॅपद्वारे ट्रेडिंग करण्यास सांगितले. सुरुवातीला, त्यांनी एका लिंकद्वारे डेमो अकाउंट वापरण्यास दिले.
त्या डेमो अकाउंटवर रक्कम गुंतवल्यास २-३ मिनिटे ट्रेडिंग करण्याची संधी मिळत होती. यावेळी, इच्छित देशांची करंन्सी खरेदी किंवा विक्री करावी लागत होती. ठराविक वेळेनंतर खरेदी-विक्री केलेल्या करंन्सीमध्ये किती नफा किंवा नुकसान झाले आहे, हे दिसत असे.
या डेमो नंतर, त्यांना प्रत्यक्ष पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. चोरट्यांनी “QX Broker” अॅपच्या QR कोडद्वारे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने ₹27,300 पाठवले. मात्र, ही रक्कम QX Broker अॅपवर दिसली नाही.
त्यांनी टेलिग्रामवर पैसे मिळाल्याची विचारणा केली असता, “आमच्यावर विश्वास ठेवा, तुमचे पैसे सुरक्षित आहेत, सर्व पैसे मोबदल्यासह परत मिळतील,” असे उत्तर देण्यात आले. त्यांना आपली फसवणूक होत असल्याची जाणीव होताच त्यांनी तातडीने सायबर क्राईम ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर, त्यांनी पाठवलेली रक्कम फ्रीज करण्यात आली. पैसे पाठवल्यानंतर लगेच फसवणुकीची शंका आल्याने आणि तातडीने तक्रार केल्याने चोरट्यांनी ती रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यापूर्वीच रोखण्यात यश आले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर करत आहेत.
