लग्न करून पती एकटाच गेला जर्मनीला : पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : “लग्न झाल्यानंतर तुला पाळीव कुत्र्यासह जर्मनीला घेऊन जाईन,” असे आमिष दाखवून लग्न केले. मात्र, पतीने तिच्या पासपोर्टला जाणीवपूर्वक उशीर होईल, असे कृत्य करून तिला जर्मनीला न नेता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून पोलिसांनी तिच्या ३९ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार २६ डिसेंबर २०२४ पासून सुरू असून, अद्यापही सुरूच आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीकडे पाळीव कुत्रा रुडी आहे, आणि तो सोडून त्या कुठेही जात नाहीत. फिर्यादीच्या पतीने खोटे बोलून लग्नानंतर तिला व तिच्या कुत्र्यासह जर्मनीला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले.
मात्र, लग्नानंतर तिच्या व्हिसाला उशीर व्हावा म्हणून त्याने विवाह नोंदणी कार्यालयात चुकीचा पत्ता दिला. त्यामुळे फिर्यादीचा व्हिसा वेळेत आला नाही. तसेच, पतीने वारंवार तिच्या भूतकाळातील गोष्टींचा उल्लेख करून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि सतत भांडणे सुरू केली.
त्याने तिचा अत्यंत क्रूर शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणाचा लष्कर पोलीस अधिक तपास करत आहेत.
