वारजे परिसरातील घटना, उत्तमनगरमधील लॉजवर नेऊन बलात्कार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील वारजे परिसरातील एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माझ्याशी लग्न कर, नाही तर मारुन टाकेन, अशी धमकी देत एका नराधमाने या मुलीचे अपहरण करुन तिला लॉजवर नेऊन अत्याचार केला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांसह लॉज मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल गौतम आणि अविनाश अशोक डोमपल्ले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील एका ११ वर्षाची मुलगी २१ मार्च रोजी दुपारी दुकानात होती.
यावेळी राहुल गौतम व त्याचा मित्र अविनाश डोमपल्ले यांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केले. तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मारुन टाकेन, अशी धमकी दिली़ त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
अविनाश डोमपल्ले यानेही तू गपमुमान याच्याबरोबर लग्न कर नाहीतर वाईट परिणाम होईल, अशी धमकी दिली. दीड वर्षापूर्वी या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला होता. लॉजमालक भगवान मोरे व लॉज मॅनेजर टिकाराम चपाघई यांनी मुलगी अल्पवयीन असतानाही तिला आरोपींबरोबर जाऊ देण्यास कोणतीही हरकत घेतली नाही.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करीत आहेत.
