वॉचमनच निघाला गुन्हेगार, हडपसर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला व्यसनाच्या आहारी नेऊन त्याच्या बँक खात्याचा अॅक्सेस घेऊन वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करून २४ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. या ज्येष्ठ नागरिकाच्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक आणि दैनंदिन गरजेच्या कामामध्ये मदत करणाऱ्यानेच मेहुण्याच्या मदतीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय ५२, सध्या रा. म्हसोबा मंदिराच्या मागे, काळेपडळ, हडपसर, मूळ रा. पातूर, ता. पातूर, जि. अकोला) आणि इफ्तीकार रहिमखान पठाण (वय ३१, रा. रेहान पार्क, गौतमनगर, गोवंडी, मुंबई) अशी दोघा मेहुण्यांची नावे आहेत.
बंगळुरू येथे राहणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या (अशोक शंकर झरेकर, वय ६४, रा. मगरपट्टा सिटी रोड, हडपसर) बँक खात्यातून अॅक्सेस घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या नावावर २४ लाख ४८ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची तक्रार दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, अशोक झरेकर हे एकटे राहत होते आणि त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये सुरक्षा रक्षक हनीफ मदत करत होता. मात्र, हनीफ नोकरी सोडून निघून गेला होता.
बँक खात्याचे स्टेटमेंट मागविल्यानंतर ही रक्कम इफ्तीकार खान आणि नूरजहाँ यांच्या बँक खात्यांवर ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. तांत्रिक तपासादरम्यान हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, गायत्री पवार यांच्या पथकाने गोवंडी येथे जाऊन इफ्तीकार पठाणला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हनीफलाही अटक केली.
हनीफ आणि इफ्तीकार पठाण हे एकमेकांचे मेहुणे असल्याचे त्यांनी सांगितले. हनीफ सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना अशोक झरेकर त्याला वेगवेगळी कामे सांगत असत. झरेकर हे एकटे राहत असल्याची माहिती हनीफने इफ्तीकारला दिली.
त्यांनी झरेकर यांच्याशी जवळीक वाढवत त्यांना व्यसनाच्या आहारी नेले. वेळोवेळी एकत्र बसून त्यांच्या मोबाईल आणि बँकिंग अॅक्सेसचा गैरवापर करत त्यांचे पैसे स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळवले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, तेजस पांडे, गायत्री पवार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, कुंडलिक केसकर यांनी केली.
