मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरुला टाकले मागे; वायव्य पुणे, पिंपरी चिंचवडला पसंती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : २०२४ या वर्षात पुणे जिल्ह्यात तब्बल ८९,०९३ घरांच्या विक्रीतून ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, पुण्याने देशातील पाच महानगरांना मागे टाकले आहे. क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी प्रसिद्ध केलेल्या पुणे हाऊसिंग रिपोर्टमधून ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत झालेली रिअल इस्टेटची वाढ शहराच्या उज्ज्वल भविष्यातील द्योतक असल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आला आहे.
घरांना असलेली वाढती मागणी आणि विकसकांकडून गरजांनुसार होत असलेला पुरवठा या घटकांच्या जोरावर देशातील मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरू या पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये रेसिडेन्शियल मार्केटची घोडदौड सुरू आहे. त्यात पुणे शहराने आघाडी घेतली आहे.
पुण्यात विक्री झालेल्या घरांच्या संख्येत आणि विक्रीमूल्यात पाच वर्षांत दीडपटीहून अधिक वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. २०२० मध्ये पुण्यात विक्री झालेल्या घरांची संख्या ५७,२६७ होती, तर मूल्य २९,१६० कोटी रुपये इतके होते. २०२४ मध्ये विक्री झालेल्या घरांची संख्या ८९,०९३ इतकी तर मूल्य ६५ हजार कोटी रुपये झाले आहे. एक कोटी रुपये व त्याहून अधिक किंमतीच्या घरांमध्ये पाच पट वाढ झाली आहे.
घरांच्या विक्रीचा विचार करता, पिंपरी चिंचवड पाठोपाठ वायव्य (उत्तर-पश्चिम) पुण्याने या विभागात आघाडी घेतली असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रो – सीआरई मॅट्रिक्सच्या अहवालात नमूद केले आहे.
घरांची उपलब्धता आणि परवडणारे दर पाहता, पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक ३५,८०४ घरांची विक्री झाली आहे. २०२० मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये १९,९३१ घरांची विक्री झाली होती. २०२० च्या तुलनेत २०२४ मध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घरांची सरासरी किंमत ५५ लाख रुपये इतकी आहे.
वायव्य पुणे या विभागात गणेशखिंड रोड, पाषाण, सूस, रेंज हिल्स, खडकी, औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी, महाळुंगे, वाकड, ताथवडे, हिंजवडी ही उपनगरे येतात. येथे २०२० मध्ये १२,८१८ घरांची विक्री झाली होती, तर २०२४ मध्ये ती १८,६१२ झाली आहे. गेल्या चार वर्षांत ही ३६ टक्क्यांनी वाढली आहे.
या विभागात सरासरी घरांची किंमत ९१ लाख रुपये नोंदवली गेली आहे. त्यात १ कोटी रुपयांखालील घरे १३,४५४, तर १ कोटी रुपयांवरील घरे ५,२३८ विक्री झाली आहेत.
इतर विभागांतील घरांच्या सरासरी किंमती
– नैऋत्य पुणे: बावधन, कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे, आनंदनगर, खडकवासला, आंबेगाव, वारजे – ८५ लाख रुपये
– मध्य पुणे: सर्व पेठा, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, कॅम्प, घोरपडी, कोरेगाव पार्क – १ कोटी २१ लाख रुपये
– ईशान्य पुणे: येरवडा, कल्याणीनगर, विमाननगर, वाघोली, हडपसर, मुंढवा – ८५ लाख रुपये
– आग्नेय पुणे: गुलटेकडी, बिबवेवाडी, कात्रज, हांडेवाडी, कोंढवा, वानवडी, उंड्री – ६८ लाख रुपये
जानेवारी ते डिसेंबर २०२४ दरम्यान विक्री झालेली घरे
– एकूण: ८९,०९३
– पिंपरी चिंचवड: ३५,८०४
– वायव्य पुणे: १८,६१२
– ईशान्य पुणे: १५,७०१
– आग्नेय पुणे: ८,८७९
– नैऋत्य पुणे: ८,८१५
– मध्य पुणे: १,२०२
घरांच्या किंमती आणि विक्री
– ४५ लाख रुपयांखालील: ३२,४८५
– ४५ लाख ते ७० लाख: २१,६११
– ७० लाख ते १ कोटी: १७,९६८
– १ कोटी ते २ कोटी: १४,२५७
– २ कोटीहून अधिक: २,७१८
