गतवर्षीपेक्षा अधिक वाहनं, दुचाकीचं शहर होतंय चारचाकींचं
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुडी पाडवा. या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे शुभ मानले जाते. गुडी पाडव्याला वाहन खरेदी करणेही शुभ मानले जाते. पुणेकरांनी या गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ३०० कोटी रुपयांची १० हजारांहून अधिक वाहने खरेदी केली आहेत. दुचाकींचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात, अर्थातच, दुचाकी वाहनांची संख्या निम्म्याहून अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २,२०० वाहनांची वाढ झाली आहे.
गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी आधीच नोंदणी केली जाते. गेल्या आठ दिवसांत जवळपास ३०० कोटींची उलाढाल वाहन खरेदीत झाली आहे.
दुचाकींचं शहर असलेल्या पुण्याची ओळख आता चारचाकींचं शहर म्हणून होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २,४२४ कारची नोंद झाली आहे. गतवर्षी २,३२६ चारचाकींची विक्री झाली होती.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने आणि पर्यावरणपूरक वाहनांची मागणी वाढत असल्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी व मोटारखरेदीत वाढ झाली आहे. कमी देखभाल-दुरुस्ती खर्च आणि सरकारी अनुदान योजनांमुळे ईव्ही वाहनांकडे लोकांचा कल वाढला आहे.
गुडी पाडव्याला झालेली वाहन खरेदी
दुचाकी – ६,५१०
चारचाकी – २,४२४
रिक्षा – २८३
टॅक्सी – २३४
बस – ६८
माल वाहतूक करणारी वाहने – ५१७
अन्य – १३४
एकूण – १०,१७०