ग्रामीण पोलिसांची रांजणगावातील सोनेसांगवीत कारवाई, मध्य प्रदेशातून आणली अग्नीशस्त्रे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रांजणगाव परिसरातील सोनेसांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ गावठी पिस्तुले, ३ मॅगझीनसह १२ जिवंत काडतुसे असा १ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
सुरज राजेश पाडळे (वय २७, रा. सोनसांगवी, ता. शिरूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सुरज पाडळे, संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी) आणि इतर दोघांनी मिळून मध्य प्रदेशात जाऊन प्रत्येकी एक याप्रमाणे चार गावठी पिस्तुले विकत घेतली. त्यासोबत जिवंत काडतुसे व अतिरिक्त मॅगझीन्स आणली होती. इतर तिघांनी ती पिस्तुले सुरज पाडळे याच्याकडे ठेवायला दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २६ मार्च रोजी अवैध धंद्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज पाडळे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनसांगवी गावात जाऊन सुरज पाडळे याला पकडले. त्याच्याकडील एक व इतर तिघांनी ठेवायला दिलेली ३ अशी चार गावठी पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे, ३ मॅगझीन्स असा १ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
सुरज पाडळे व संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे आणि आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. नव्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने ७ पिस्तुले व १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे सध्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीसाठी पुण्यात आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर पिस्तुले हस्तगत केल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, तसेच पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली आहे.
