अण्णासाहेब मगर महाविद्यालयात : सेवानिवृत्त प्राध्यापकाचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात क्रीडा शिक्षक प्रा. अनिल दाहोत्रे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते प्रा. अनिल दाहोत्रे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि संपूर्ण पोशाख असे सत्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक संजय आवटे, क्रीडा मंत्रालयाचे ओ.एस.डी. रणजीत चामले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक क्रीडा संचालक प्रा. सुदाम शेळके, माजी उपसंचालक व युवक सेवा संचालनालयाचे संचालक विजय संतान, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे क्रीडा प्रमुख शाम भोसले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे होते.
संजय आवटे यांनी आपल्या भाषणात शिक्षक हा समाजासाठी लोकशिक्षक असतो, असे नमूद केले. ते म्हणाले, “शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचा दिवस साजरा होणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव होणे, ही मोठी बाब आहे. शिक्षक भविष्यातील पिढी घडवतात. त्यांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण विद्यार्थी करतात. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करण्याचे कार्य प्रा. अनिल दाहोत्रे यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आहे.”
विजय संतान यांनी प्रा. दाहोत्रे यांनी भविष्यातही गरीब विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रा. दाहोत्रे यांच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “त्यांनी महाविद्यालयात खेळाची आवड निर्माण करून अनेक विद्यार्थी घडवले. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना यश मिळवून दिले.”
सत्काराला उत्तर देताना प्रा. अनिल दाहोत्रे यांनी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने मला शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून मी प्रामाणिकपणे काम केले. माझ्या कारकिर्दीत मला चांगले कार्य करण्याची संधी मिळाली आणि माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला, याचा मला अभिमान वाटतो.”
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी प्रा. दाहोत्रे यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “त्यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. संस्थेतील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करू.”
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रितम ओवाळ, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. विलास घोगरे, प्रा. शेखर कुलकर्णी, प्रा. अशोक आवरी, प्रा. दीपक जांभळे, प्रा. सिंधू मोरे, प्रा. संजीव पवार, कृष्णकांत कोबल, भारती दाहोत्रे, गणेश साबळे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास शिंदे यांनी केले. प्रा. भागवत भराटे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना जाधव यांनी केले, तर प्रा. जयश्री अकोलकर यांनी आभार मानले.
