महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तेलंगणातील श्रीशैलमवरून नगरकुर्लुणला जात असताना झालेल्या कार अपघातात पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचा मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.
डॉ. सुधाकर पठारे हे मुंबई पोलीस दलाच्या पोर्ट झोनमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून सध्या कार्यरत होते. ते प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारने एस.टी. बसला जोरात धडक दिली. या अपघातात त्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
सुधाकर पठारे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वळवणे येथील रहिवासी होते. आयपीएस होण्यापूर्वी त्यांनी विविध सरकारी विभागांमध्ये अधिकारी म्हणून काम केले होते. पठारे यांनी एम.एस्सी. (कृषी) आणि एल.एल.बी. केले होते.
१९९५ मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक झाले. १९९६ मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. १९९८ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर पोलीस सेवा हेच आपले कार्यक्षेत्र त्यांनी निश्चित केले.
सुधाकर पठारे यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी चंद्रपूर, वसई येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अमरावती येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तडीपारी, मोक्का अशा कायद्यांचा प्रभावी वापर करत ते गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करत असत.
