सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकाजवळील घटना : साईबा अमृततुल्य मालकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकातील चहाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी साईबा अमृततुल्य हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
या आगीत संतोष श्रीसेन हेगडे (वय २६) यांचा मृत्यू झाला. केशव श्रीमंत जाधव (वय २८, रा. भिंताडे अपार्टमेंट, शेलार मळा, कात्रज कोंढवा रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे.
याबाबत प्रसाद कृष्णहरी केंची (वय ३०, रा. मानसरोवर अपार्टमेंट, आनंदनगर, सुखसागर नगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
के. के. मार्केटजवळील अहिल्यादेवी चौकात साईबा अमृततुल्य हे हॉटेल आहे. रविवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच कात्रज व गंगाधाम अग्निशमन केंद्रातील गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आतमध्ये एक कामगार अडकला असल्याची माहिती मिळताच जवानांनी पाण्याचा मारा करून जखमी अवस्थेत त्या कामगाराला बाहेर काढले.
या आगीच्या झळा शेजारील फिर्यादीच्या क्लेझंट होम डेकोर दुकान आणि कपड्यांच्या दुकानापर्यंत पोहोचल्या, ज्यामुळे त्यांच्या दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले. साईबा अमृततुल्य या चहाच्या दुकानात दूध तापवत असताना वायू गळती झालेल्या सिलेंडरमुळे ही आग लागली.
त्यावेळी संतोष हेगडे या कामगाराला बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अमृततुल्यमध्ये एकूण ८ सिलेंडर होते, त्यापैकी ३ सिलेंडरमधून वायू गळती झाल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत निष्पन्न झाले.
अग्निशमन दलाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. दुकानात कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना न घेतल्याने पोलिसांनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
















