आंबेगावातील दुकानातून १ लाख ६० हजार ७६७ रुपयांचा बनावट माल जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आंबेगाव येथील एका दुकानावर छापा टाकून आंबेगाव पोलिसांनी हारपिक, ऑल आऊट, लायझोल या कंपन्यांची बनावट उत्पादने बनवून त्यांची विक्री करण्याचा प्रकार समोर आणला आहे.
पोलिसांनी आंबेगावातील दुकानातून १ लाख ६० हजार ७६७ रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. याबाबत अशरफुद्दीन फैयाजुउद्दीन इनामदार (वय ४१, रा. शास्त्रीनगर, रहाटणी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी उबेद आसिफ शेख (वय २९, रा. हडपसर, सध्या रा. वाघजाईनगर, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशर आईपी प्रोटेक्शन एजंन्सीचा प्रतिनिधी आहे. हारपिक कंपनीची लिक्विडची बाटली, लायझोल लिक्विडची बाटली, ऑल आऊट लिक्विड बाटली आणि टाटा टी अग्नी यांच्या बनावट उत्पादनांची विक्री केली जात असल्याची माहिती फिर्यादींना मिळाली होती.
त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिसांनी वाघजाईमाता मंदिराजवळील उबेद शेख याच्या दुकानावर शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता छापा टाकला. त्यात हारपिक, लायझोल, ऑल आऊट, टाटा टी अग्नी या कंपन्यांची उत्पादने बनावट करून विक्री केली जात असल्याचे दिसून आले.
दुकानातून पोलिसांनी १ लाख ६० हजार ७६७ रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.
