ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचा खंडणीसाठी निर्घृण खून
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ठेकेदार विठ्ठल सखाराम पोळेकर यांचा २ कोटींच्या खंडणीसाठी निर्घृण खून करणाऱ्या टोळीप्रमुख योगेश भामे व त्याच्या टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
योगेश ऊर्फ बाबू किसन भामे (वय ३२), रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, दोघेही रा. डोणजे, ता. हवेली), मिलिंद देविसदास थोरात (वय २४, रा. वाघोली, ता. हवेली, मूळ रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. वाघोली, मूळ रा. खळवाडी, चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), रामदास दामोदर पोळेकर (वय ३२, रा. पोळेकरवाडी, डोणजे, ता. हवेली) अशी मोक्का कारवाई झालेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
या टोळीचे खडकवासला, डोणजे तसेच सिंहगड रोड परिसरात वर्चस्व आहे. टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांनी ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या रस्त्याच्या कामात अडथळा आणू नये, यासाठी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
त्यांनी नकार दिल्यानंतर योगेश भामे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोळेकर यांचे अपहरण केले व त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फेकून दिले होते.या घटनेनंतर दोन महिन्यांनी योगेश भामे पोलिसांच्या हाती लागला. भामेवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या टोळीने सातत्याने आणि संघटितपणे चालवलेल्या बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्यांना वेळीच पायबंद घालणे अत्यंत निकडीचे झाल्याने हवेली पोलिसांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविला.
त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी करीत आहेत.
