आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ज्येष्ठ महिलेची पेटवून घेत आत्महत्या

Spread the love

पुणे : कोथरूड भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडल्या. ७६ वर्षांच्या या महिलेने पेटवून घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृत महिलेचे नाव आहे. कोथरूडमधील गुरुगणेशनगर परिसरातील एका सोसायटीत त्या भाड्याच्या घरात एकट्या राहात होत्या. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला त्यांच्या फ्लॅटमधून धूर येत असल्याची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि त्यांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाजा उघडला असता, घुगे गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळल्या. फ्लॅटमधील इतर साहित्याला आग लागलेली नव्हती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घुगे या एकट्याच राहात होत्या. त्यांना मुलगा व मुलगी असून ते स्वतंत्र राहतात. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली. पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.