सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : फनटाईम थिएटरच्या मागे मध्यरात्री केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडगाव येथील फनटाईम थिएटरच्या मागे थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा ४२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
साहिल मार्तंड साखरे (वय २३, रा. दांगट चाळ, साई चौक, वडगाव बुद्रुक) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सिंहगड पोलीस ठाण्यातील तपास पथक हे ३० मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते. ३१ मार्चच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार सागर शेडगे व देवा चव्हाण यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फनटाईम थिएटरच्या मागे कॅनॉलजवळ एक जण थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे.
या बातमीनुसार पोलीस घटनास्थळी गेले. तेव्हा पोलिसांशी नजरानजर होताच तो निघून जाऊ लागला. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी त्याला थांबवून विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
तेव्हा पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा ४२ हजार रुपयांचा माल मिळून आला. पोलिसांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, अमोल पाटील, निलेश भोरडे, गणेश झगडे, देवा चव्हाण, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, सांगर शेडगे, विनायक मोहिते यांनी केली आहे.
