ई-बाईक टॅक्सीला मंजुरी : पेट्रोल बाईक टॅक्सीला नकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यात ई-बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
सरकारच्या ई-बाईक टॅक्सी धोरणाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. यामध्ये केवळ इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीच धावणार असल्याचे सांगण्यात आले असून, पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी मिळणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर राज्यात ई-बाईक धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश सिंगल प्रवाशांची गैरसोय दूर करणे हा आहे. यापूर्वी प्रवाशांना रिक्षा किंवा टॅक्सीचे संपूर्ण भाडे द्यावे लागत होते, मात्र ई-बाईक टॅक्सीमुळे प्रवाशांना कमी खर्चात प्रवास करता येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे सरनाईक यांनी सांगितले. ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर १०,००० हून अधिक रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार ई-रिक्षा आणि ई-टॅक्सी चालकांना १०,००० रुपयांचे अनुदान देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अनेकांना आर्थिक मदत मिळणार असून, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार आहे.
या धोरणांतर्गत १५ किलोमीटर अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच, ५० बाईक टॅक्सी एकत्र घेणाऱ्या संस्थेला तत्काळ परवानगी दिली जाईल.
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये काही नव्या नियमांची अंतर्भूती करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ई-बाईक टॅक्सीच्या या नव्या धोरणामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडणार आहे.
