कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहायक १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डिसेंबर २०२३ मध्ये बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा केलेल्या फर्निचरच्या २० लाखांच्या बिलापैकी १० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १३ टक्के लाच घेतली जात असल्याचे उघउ झाले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेताना बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक व वरिष्ठ सहायकाला रंगेहाथ पकडले.
वरिष्ठ सहायक जयंत पर्वत चौधरी (वय ४९) आणि कार्यालयीन अधीक्षक सुरेश विश्वनाथ बोनवळे (वय ५३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचा फर्निचर सप्लायचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने डिसेंबर २०२३ मध्ये २० लाख २० हजार रुपयांचे फर्निचर बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले होते.
तक्रारदार यांनी या बिलासाठी २०२४ मध्ये भरपूर पाठपुरावा केला. परंतु, प्रत्येक वेळी त्यांनी फर्निचर बँडेड नाही, आता निधी मंजूर नाही, असे सांगून बिल काढण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ते १० लाख रुपयांचे बिल काढतो, असे सांगितले.
हे बिल मंजूर करण्यासाठी १३ टक्के प्रमाणे १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. बिल मंजूर करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिक काळ लावला. त्यातच अर्धे बिल काढणार, त्यावर १३ टक्के लाच या मागणीमुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन १ एप्रिल रोजी तक्रार दिली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जयंत चौधरी व सुरेश बोनवळे यांच्याकडे पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा तडजोडीअंती १ लाख रुपये लाच घेण्यास त्यांनी सहमती दर्शविली. तसेच सुरेश बोनवळे याने ही लाचेची रक्कम जयंत चौधरी याच्याकडे देण्यास तक्रारदार यांना सांगण्यात आले.
त्यानुसार बी जे वैद्यकीय महाविद्यालयात २ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना जयंत चौधरी याला पकडण्यात आले. पाठोपाठ सुरेशा बोनवळे यालाही ताब्यात घेण्यात आले.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.
