रजिस्ट्रेशनसह तरुणींना डेटिंगवर पाठविण्याच्या नावाखाली दोघांनी घातला गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुलींबरोबर डेटिंग करण्यासाठी एका एमबीए झालेल्या तरुणाने डेटिंग अॅपवर सर्च केले. त्यातून तरुणीं पुरविण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्याने या तरुणाला तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत गुरुवार पेठेतील २९ वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ९ नोव्हेंबर २०२४ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शिक्षण एमबीए झाले असून ते काही काळ एका बँकेत नोकरीला होते. सध्या ते घरीच आहेत.
९ नोव्हेंबर २०२४ रोजी घरी असताना मोबाईवर गुगलवर डेटिंग साईट सर्च करत असताना त्यांना लोकांटो डेटिंग बेबसाईटवर एक मोबाईल नंबर मिळाला. त्यावर त्यांनी व्हॉटसअॅपवर संपर्क केला. त्याने क्युआर कोड पाठवून ५०० रुपये बुकीचे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने पैसे पाठविले. त्यानंतर रजिस्टेशनसाठी ५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याने ७ ते ८ तरुणींचे फोटो पाठविले.
शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये यातील तरुणीला भेटण्यास जाण्यासाठी सांगितले आहे, असे कळविले. त्याप्रमाणे हा तरुण तेथे गेला. परंतु, तेथे कोणतीही तरुणी दिसून आली नाही. त्यानंतर त्यानेवेगवेगळी कारणे सांगून आणखीन पैसे वाढवून मागत होते. त्याप्रमाणे हा तरुण पैसे पाठवत गेला.
त्याने सांगितल्याप्रमाणे १ लाख ३३ हजार ५०० रुपये पाठविले. त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. या तरुणाने या वेबसाईटवरुन दुसरा मोबाईल नंबर शोधून त्यावर संपर्क साधला. त्याने २ हजार रुपये रजिस्ट्रेशनसाठी घेतले.
डेटिंग कधी होणार अशी या तरुणाने चौकशी केल्यावर तोही वेगवेगळी कारणे सांगून आणखीच पैसे मागू लागला. त्यावर या तरुणाने पैसे पाठविले बंद केले. त्यानंतर या तरुणाने त्या वेबसाईटवरुन तिसरा मोबाईलवर संपर्क साधला. त्याने हा फोन गुजरातमध्ये लागला असल्याचे सांगितले. त्यावर या तरुणाने आपण पाठविलेले पैसे परत मागितले.
त्याचे बोलणे ऐकून त्याने फोन कट केला. तेव्हा आपली फसवणुक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात आले. त्याने ८ डिसेंबर २०२४ रोजी सायबर पोर्टलवर तक्रार केली होती. परंतु, त्यावर काहीएक प्रतिसाद न मिळाल्याने आता त्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे तपास करीत आहेत.
