1 मे पासून महसूल विभागाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मालमत्ता नोंदणी संदर्भात महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात मालमत्ता खरेदी विक्री प्रक्रियेला अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी 1 मे पासून” एक राज्य ‘एक नोंदणी “मोहीम राबवली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांना राज्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात दस्तनोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित नोंदणी योजना संपूर्ण राज्यात अंमलात आणली जात आहे. ही प्रणाली डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देणारी आहे. नागरिकांना दस्तनोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. दस्तांची ऑनलाईन मूल्यांकन प्रणाली लागू केल्यामुळे महसुलात अपव्यय किंवा चुकीच्या नोंदींसाठी वाव राहणार नाही.
तसेच या योजनेच्या अधिक सुरक्षित अंमलबजावणीसाठी दस्तावर अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी बंधनकारक असणार आहे. तसेच नागरिकांच्या ओळखीची पडताळणी आधारकार्ड आणि पॅन कार्डच्या मदतीने केली जाणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या एकत्रित नोंदणी योजनेबाबत असे म्हणाले, खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी संबंधित जिल्ह्यातील विशिष्ट नोंदणी कार्यालयातच याआधी नागरिकांना करावी लागत असे.
त्यामुळे नागरिकांना अनावश्यक वेळ खर्च करावा लागत होता. आता या नव्या योजनेमुळे कोणत्याही जिल्ह्यात दस्तनोंदणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे.
