हडपसर पोलिसांनी तपास करून लावला शोध, सीसीटीव्ही फुटेज दाखवताच परत केली पर्स
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सीएनजी भरण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर एका महिलेची पर्स खाली पडली होती. मागच्या गाडीतील प्रवाशाने ती गपचूप उचलून स्वतःकडे ठेवली. हडपसर पोलिसांनी शोध घेऊन त्या गाडीच्या चालकाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता, तो सरळ झाला आणि लातूरहून येऊन पर्स परत केली. हडपसर पोलिसांनी संबंधित महिलेला दागिने, मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून दिली.
वारजे माळवाडी येथील एक महिला कुटुंबासोबत १ एप्रिल रोजी बालाजी पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी आल्या होत्या. गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांची पर्स खाली पडली. त्यामध्ये मंगळसूत्र, मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे व एक हजार रुपये असा ऐवज होता.
गॅस भरून त्या घरी गेल्यानंतर त्यांना पर्स हरवल्याचे लक्षात आले. पर्स कुठे पडली याचा त्यांनी शोध घेतला, परंतु ती मिळाली नाही. शेवटी त्या हडपसर पोलीस ठाण्यात गेल्या. तपास पथकातील पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांनी या पर्सचा शोध घेतला.
त्यांनी सीएनजी पंपावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यामध्ये पर्स खाली पडताना व मागच्या गाडीतील प्रवाशाने ती उचलताना स्पष्ट दिसून आले. त्यानुसार त्या गाडीचा नंबर घेऊन मालक व ड्रायव्हर यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
संबंधित ड्रायव्हर पॅसेंजर घेऊन लातूरला गेला होता. सुरुवातीला त्याने पर्सबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. नंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज पाठवण्यात आले. फुटेजमधील व्यक्ती त्याच्या गाडीतील पॅसेंजर आहेत का, हे विचारल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन गाडी हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार त्याने २ एप्रिल रोजी गाडी पोलीस ठाण्यात आणली. रात्री ठाण्यातील अंमलदारांनी गाडीतील पॅसेंजरकडून पर्स घेऊन ती संपूर्ण सामानासह सुरक्षितपणे संबंधित महिलेला परत दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड आणि पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांनी पार पाडली.
