आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नोटा उधळणाऱ्या टिपू पठाणवर कारवाई

Spread the love

पुणे : कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळणारा आणि सय्यदनगर येथील महिलेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून २० लाखांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड टिपू पठाण आणि त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडळ पोलिसांनी जेरबंद केले आहे.

रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण याने एका कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात पाठवले.

सय्यदनगर येथील एका ५० वर्षांच्या महिलेने २ एप्रिल रोजी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, मागील ३ वर्षांपासून रेकॉर्डवरील गुंड टिपू पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी ७ ते ८ साथीदारांसोबत बेकायदेशीर जमाव करून तिच्या सय्यदनगर येथील १२९० स्क्वेअर फूट मोकळ्या प्लॉटवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

ही जागा तिची असून ती तिने तिच्या भावाच्या, म्हणजेच इजाज पठाणच्या नावाने खरेदी केली आहे. या जागेवर बांधलेले पत्र्याचे शेड काढून टाका, नाहीतर जागा कशी ताब्यात घ्यायची हे मला चांगले माहीत आहे, अशी धमकी टिपू पठाण याने दिली. त्यानंतर शेड उचकटून त्यावरील महिलेचे नाव खोडून त्यावर आपल्या भावाचे नाव लिहिले.

जागा हवी असल्यास २० लाख रुपये द्या, अशी मागणीही केली. तसेच जबरदस्तीने वाद घालून प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी तातडीने टिपू पठाण, इजाज पठाण आणि त्यांच्या ७ ते ८ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यात कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यावर तो सय्यदनगर परिसरात येणार असल्याचे समजले.

त्यानुसार पोलिसांनी सय्यदनगर रेल्वे मार्गाजवळ इजाज सत्तार पठाण (वय ३९, रा. सय्यदनगर, हडपसर) याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे यांनी केली आहे.