मोबाईल, व्हॉट्सअॅप आणि बँक खात्यांचा सखोल तांत्रिक तपास : ऑनलाईन गुन्ह्याचा पर्दाफाश
पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत एक व्यवसायिक यांची तब्बल ४१ लाख १० हजार रुपयांची फसवणूक परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मंद्रूप पोलीस ठाणे गु.र.नं. ३४१/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या बीएनएस ३१८ (४), ३१६ (२) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००९ चे कलम ६६(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार हे व्यवसायिक असून, ‘मोतीलाल ओखाल इन्वेस्ट क्लब’ या बनावट व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधून, विश्वास संपादन केला.
त्यानंतर ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२४ या कालावधीत एकूण ४२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण आणि प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.
तपासकार्याचे नेतृत्व विकास दिंडुरे (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे), राहुल देशपांडे (पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे) आणि रोहिदास पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे) यांनी केले.
तपासात सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणच्या पथकातील खालील अंमलदारांचा सक्रिय सहभाग होता म. पो. ह. ज्योती फुलारी, पो. ह. अभिजीत पेठे, पो. ह. जुबेर तांबोळी, पो. ह. युसुफ पठाण, पो. ह. व्यंकटेश मोरे, म. पो. ना. अंबरकर, पो. शि. स्पनिल सन्नके, पो. शि. अजित सुखसे, पो. शि. रतन जाधव,पो.शि. आशुतोष कुलकर्णी, पो.शि. जहीरान नाईकवाडी या पथकाने अत्यंत सुसंगत तांत्रिक तपासाद्वारे आरोपीच्या मोबाईल नंबर, व्हॉट्सअॅप ग्रुप, आणि बँक खात्यांची माहिती मिळवून एकूण ४१ लाख १० हजार रुपये तक्रारदारास परत मिळवून दिले.
या उत्कृष्ट कामगिरीसाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी संबंधित सर्व अधिकारी आणि अंमलदारांना बक्षिस देवून गौरविले.
तसेच, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन फसवणुकीबाबत तक्रार असल्यास १९३० या टोल फ्री क्रमांकावर किंवा सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे संपर्क साधावा.
