चालू वर्षातील दहा गुन्हे उघड : सव्वा बारा लाखाचे सोने जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मध्यरात्री विनाकारण फिरणाऱ्या टोळीला अटक केल्यानंतर या टोळीकडून चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. ही टोळी पीएमपीएमएल बसमधील एकट्या दुकट्या नागरिकांना हेरून चोऱ्या करायची. आतापर्यंत या टोळीकडून चोरीचे 10 गुन्हे उघड झाले असून, या टोळीकडून सव्वा बारा लाखांचे सोने जप्त केले आहे.
याप्रकरणी प्रशांत मिठु थोरबोले (वय 22), शितल श्रीनिवास वाडेकर (वय 29), भिमबाई रमेश बजंत्री (वय 45, सर्व रा. मुंढवा परिसर), अरूण शिवाजी गायकवाड (वय 38), मोहन गणेश जाधव (वय 30), शिवराज अर्जुन वाडेकर (वय 22) यांना अटक केली होती. आता त्यांच्याकडून चोरीचे चालु वर्षातील 10 गुन्हे उघड झाले आहेत, असे पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, टोळी बसमध्ये एकत्रित घुसत असत. प्रवास सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ महिला व नागरिक तसेच ज्यांच्याकडे ऐवज असू शकतो, अशा व्यक्तींना हेरत असे. त्यानंतर त्यांच्याजवळ जाऊन उभा राहत त्यांच्याजवळ गरडा घालत असे. तसेच, त्यांचेजवळील सोन्याचे दागिने व रोकड चोरत असत. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हे गुन्हे कबूल केले आहेत. पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनिकेत बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
