घरातून चोरले साडेपाच लाखांचे दागिने : पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दोघीही पुण्यात सदाशिव पेठेत एकत्र अभ्यास करत असत. त्यातून त्यांच्या मैत्रीचा संबंध जुळला. पुढे दोघींचे विवाह झाले. योगायोगाने दोघींचे सासर सिंहगड रोडवरील आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार येथे निघाले. विवाहानंतर दोघींचे एकमेकींच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. यापैकी एकीला शेअर मार्केट आणि ऑनलाईन गेमिंगची सवय लागली होती. त्यासाठी तिने आपल्या मैत्रिणीच्या घरी चोरी करण्याचा कट रचला.
ती मैत्रीण कोल्ड कॉफी घेऊन फिर्यादीच्या घरी आली आणि त्यात गुंगीचं औषध टाकलं. फिर्यादीला गुंगी आल्यावर तिने घरातील कपाटातून ५ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरले आणि पलायन केलं.
याबाबत ३१ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आंबेगाव पठार येथील २५ वर्षांच्या आरोपी मैत्रीणीला अटक केली आहे. न्यायालयाने तिला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा प्रकार ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आंबेगाव बुद्रुक येथील फिर्यादीच्या घरी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी तरुणी दोघी मैत्रिणी आहेत. आरोपी ही मूळची लातूरची, तर फिर्यादी पुण्यातील रहिवासी आहे.
विवाहापूर्वी त्या सदाशिव पेठेतील एका खोलीत अभ्यास करत असत. त्यातून त्यांची ओळख व मैत्री झाली. फिर्यादी एका अभ्यासक्रमाची प्रशिक्षणार्थी असून आरोपी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
विवाहानंतर त्या आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार येथे राहू लागल्या. त्यामुळे त्यांचे परस्पर घरी जाणं-येणं सुरू होतं. ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आरोपी कोल्ड कॉफी घेऊन फिर्यादीच्या घरी आली.
फिर्यादीने कॉफी पिल्यानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर आरोपीने घरातील कपाटातून ५ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरले. काही दिवस हा प्रकार लक्षात न आल्यामुळे फिर्यादीने उशिरा तक्रार दिली.
दोन दिवसांपूर्वी तिला दागिने दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास करून तिच्या मैत्रीणीलाच अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.
