आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कपड्याचे दुकान फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला केले जेरबंद

Spread the love

पुणे : त्रिमूर्ती चौकातील कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून त्यातून अडीच लाख रुपयांचे कपडे व रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

सुलतान रिजवान शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक २३, शिवनेरीनगर, भगवा चौक, कोंढवा) असे या चोरट्याचे नाव आहे. दुकानातून चोरलेले १५ हजार रुपयांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती चौक येथील परदेशी निवास इमारतीत ‘अल्फा मेन्स हब’ हे दुकान आहे. या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी २८ व २९ मार्चच्या दरम्यान रात्री २ लाख ३२ हजार रुपयांचे कपडे व रोख रक्कम चोरून नेली होती.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केलेल्या तपासात पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार यांना ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार सुलतान शेख याने केल्याची माहिती मिळाली.

त्याचा शोध घेत असताना तो कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे मिळून आला. पोलिसांनी त्याला २ एप्रिल रोजी अटक केली. त्याने साथीदाराच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून १५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, उर्वरित माल व साथीदाराचा तपास सुरू आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोळे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार यांनी केली आहे.