शेतकर्याकडून एक लाखांची लाच घेताना अटक : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदल्याप्रकरणी वनरक्षकाने २ लाख रुपयांची लाच मागितली, तडजोडीअंती १ लाख रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला रंगेहाथ पकडले. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२, वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड वन विभाग) असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या तरुण शेतकार्याने तक्रार दिली आहे.
सासवड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात गोविंद निर्डे वनरक्षक आहे. तक्रारदार तरुणाने पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदला होता. वन विभागाने हा प्रकार सांगितल्यावर तक्रारदाराने खड्डा बुजविला.
त्यानंतर वनरक्षक निर्डे याने याप्रकरणात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच निर्डे याने तक्रारदाराला मागितले.
तक्रारदाराने ३ एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुपचत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात निर्डे याने तडजोडीत १ लाख रुपये घेण्याचे मान्य केले.
निर्डे याने तक्रारदाराला एक लाख रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी बोलाविले. त्यानंतर सासवड येथील वीरफाटा येथील श्रीनाथ रसवंती गृह येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार तरुणाकडून एक लाख रुपयांची लाच घेताना निर्डे याला पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे अधिक तपास करीत आहेत.
