रामनवमीच्या शुभमुहूर्तावर शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते लोकार्पण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून कोट्यवधी भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा अबाधित राहावी, तसेच बाराही महिने शुद्ध व थंड पाणी सहज उपलब्ध व्हावे, या हेतूने रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशनतर्फे “प्याऊ – जल प्रकल्प” उभारण्यात आला असून, त्याचे लोकार्पण रामनवमीच्या शुभमुहूर्तावर फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारीवाल यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रकल्पांतर्गत २६.५० लाख रुपयांचा निधी खर्च करून २००० लिटर क्षमतेचा आर. ओ. प्लांट उभारण्यात आला आहे. मंदिराच्या चारही मजल्यांवर थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, भाविकांसाठी ही एक अत्यंत उपयुक्त सुविधा ठरणार आहे.
“हा प्रकल्प भवानी मातेच्या चरणी सेवाभावाने अर्पण करताना मला अत्यंत आनंद होत आहे,” अशी भावना शोभाताई धारीवाल यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, आर. एम. डी. फाउंडेशनतर्फे संपूर्ण भारतभर शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक उद्याने, बाजारपेठा तसेच धार्मिक स्थळांवर शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.
या उपक्रमाबद्दल देवस्थान समितीचे विश्वस्त व आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी शोभाताई धारीवाल यांचा साडी, श्रीफळ आणि भवानी मातेची प्रतिमा देऊन सन्मान केला व त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी धाराशिवचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तुळजाभवानी सैनिक विद्यालयाचे कमांडंट व प्राचार्य, देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी, लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष आकाश राठी, उद्योजक प्रदीप राठी, चंदकरण लड्डा तसेच माढा (सोलापूर) येथे फाउंडेशनतर्फे लवकरच उभारण्यात येणाऱ्या “शोभाताई धारीवाल शेतकरी प्रशिक्षण केंद्रा”चे पदाधिकारी महेश डोके व धनराज शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
