मार्केटयार्ड परिसरातील घटना : १७ लाखांची रोख रक्कम चोरीला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड परिसरातील एका बंगल्यातून रखवालदार आणि त्याच्या साथीदाराने १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि हिरेजडित दागिने असा एकूण ३१ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला नेला.
याबाबत हरमितसिंग सलुजा (वय ३९, रा. सलुजा चेंबर्स, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धर्मा शाही (रा. नेपाळ) व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (६ एप्रिल) पहाटे अडीच ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलुजा हे व्यावसायिक असून, रविवारी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत बंगल्यातील रखवालदाराने आपल्या साथीदारासोबत मिळून बंगल्यात प्रवेश केला.
बेडरूममधील कपाट उचकटून त्यातील १७ लाख १५ हजार रुपयांची रोकड व हिरेजडित दागिने असा एकूण ३१ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सलुजा कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे आणि रखवालदार पसार झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत.
