वानवडी पोलिसांनी केली चौघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फातिमानगर भागात घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल फोन, रेसिंग बुक आणि इतर साहित्य असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मेहमूद शेख, फैज शेख (वय २९, दोघे रा. फातिमानगर, वानवडी), चाँद शेख (वय २९, रा. वानवडी), अकबर खान (वय ४६, रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम नवमीनिमित्त वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती मिळाली की फातिमानगर येथे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजी सुरू आहे.
त्यानंतर पोलिसांनी बालाजी दर्शन येथील एका फ्लॅटवर छापा टाकला. तेथे मेहमूद शेख हा ओळखीच्या ग्राहकांकडून रेसकोर्समधील घोड्यांवर ऑनलाईन जुगार स्वीकारताना आढळून आला.
त्याच्यासोबत फैज मेहमूद शेख, चाँद शेख आणि अकबर खान हे देखील ऑनलाईन रिंगद्वारे जुगार खेळवून पैशांची देवाण-घेवाण करत होते. त्यांच्याकडून ऑनलाईन सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल फोन, रेसिंग बुक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजीस बंदी असून, आरोपी मेहमूद हे सर्व व्यवहार मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने हाताळत होता. शर्यत संपल्यानंतर सट्टेबाजांना पैसे दिले जात आणि दर सोमवारी मुंबईहून पैसे प्राप्त होत असत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व बालाजी वाघमारे यांनी केली.
