चार गुन्हे उघडकीस, साडेचार लाखांचा माल जप्त : आंबेगाव पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, चार लॅपटॉप, दुचाकी, रिक्षा असा एकूण ४ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आयुष संजय खरात (वय २०, रा. सुखसागर नगर, कात्रज) आणि आर्यन कैलास आगलावे (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
संतोषनगर परिसरातील तिरुपती कॉलनीत राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरी १६ मार्च रोजी चोरी झाली होती.
याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आंबेगाव पोलिसांकडून सुरू होता. पोलीस हवालदार हनमंत मासाळ आणि चेतन गोरे यांना मिळालेल्या माहितीवरून आयुष खरात आणि आर्यन आगलावे यांनी घरफोडी केल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तपासादरम्यान, त्यांनी आंबेगाव, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चार लॅपटॉप, दुचाकी आणि रिक्षा असा एकूण ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोंढवा आणि मार्केटयार्ड येथील घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आगलावे हा वॉन्टेड आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे आणि योगेश जगदाळे यांनी केली.
