टेस्ट ट्युब बेबींची योग्य वाढ होत नसल्याने तणावातून प्रकार : लोणी काळभोरमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोथरुडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरण गाजत असतानाच, टेस्ट ट्युब बेबीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन जुळी मुले झाल्यानंतर त्यांच्या योग्य वाढीअभावी आईने तणावातून २ महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवून जीवे मारले आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. या प्रकरणी संबंधित महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्या आधारे पोलिसांनी या ३५ वर्षांच्या महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाशी झाला आहे. ती मूळची सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील मिरजवाडी येथील आहे. विवाहानंतर १० वर्षांनंतरही त्यांना मूल होत नसल्यामुळे त्यांनी मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला.
बाळंतपणानंतर त्या माहेरी – दत्तनगर येथे आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून दोन महिन्यांपूर्वी त्यांना दोन जुळे मुले झाली होती. मात्र, या बाळांची वाढ योग्य प्रकारे होत नव्हती.त्याचबरोबर महिलेचीही प्रकृती अत्यंत अशक्त झाली होती आणि त्यांना काही आजार होता.
मुलांची वाढ न होणे आणि त्यावर होणारा खर्च परवडत नसल्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. या तणावातूनच त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत दोन्ही बाळांना बुडवले आणि नंतर स्वतःही त्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार शेजारच्या लोकांनी पाहिला आणि पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन महिलेला टाकीतून बाहेर काढले, परंतु तोपर्यंत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला होता. या महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
