आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शंतनु कुकडे बलात्कार प्रकरणात ६ जणांना अटक

Spread the love

पुणे : भूतानहून आलेल्या आणखी एका महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर ९ जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनु कुकडे याला बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करून एका वकिलासह सहा जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ऋषिकेश गंगाधर नवले (वय ४८), प्रतीक पांडुरंग शिंदे (वय ३६), अ‍ॅड. विपीन चंद्रकांत बिडकर (वय ४८), सागर दशरथ रासगे (वय ३५), अविनाश नोएल सूर्यवंशी (वय ५८), आणि मुद्दसीर इस्माईल मेमन (वय ३८) यांचा समावेश आहे. जालिंदर बडदे आणि उमेश शहाणे हे दोघे अद्याप फरार आहेत.

नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या असहाय्य महिलांना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनु कुकडे याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

मंगळवारी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयात सांगितले की, पीडित महिला भूतान देशातील नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या.

त्या निराधार आणि असहाय्य असताना, शंतनु कुकडे याने त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय करून वेळोवेळी त्यांच्यावर बलात्कार केला. त्याच्या इतर साथीदारांनीही त्याच महिलांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

पीडित महिलेने आरोपींच्या नावांसह थेट तक्रार दाखल केली आहे. आरोपी एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले का? तसेच या प्रकरणात इतर कोणते साथीदार आहेत का? याचा तपास करायचा आहे.

गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे, तसेच या आरोपींनी इतर कोणत्या निराधार महिलांचे शोषण केले आहे का, हे तपासायचे आहे, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयात नमूद केले.न्यायालयाने सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.