धनकवडी व बालाजी नगरमध्ये रॅलीचे आयोजन : विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे: भगवान महावीर यांचा २६२३ वा जन्म कल्याणक सोहळा धनकवडी व बालाजी नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या स्मरणार्थ जैन समाजाने विविध उपक्रम राबवले.
धनकवडी व बालाजी नगर जैन श्रावक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीचा शुभारंभ धनकवडी जैन स्थानक येथून नगरसेविका आश्विनीताई भागवत यांच्या हस्ते करण्यात आला.
मिरवणूक गुलाब नगर, धनकवडी गाव, तीन हत्ती चौक, संभाजीनगर, विश्वेश्वर बँक चौक, पवार हॉस्पिटल व विमलनाथ जैन मंदिर मार्गे बालाजी नगर जैन स्थानक येथे संपन्न झाली.
या मिरवणुकीत खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेविका वर्षाताई तापकीर, सामाजिक कार्यकर्ते गणेश गांधी, ऋषभ शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी जैन समाजाला महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनकवडी व बालाजी नगर श्री संघाचे पदाधिकारी, युवक-युवती मंडळ, महिला मंडळ आणि अनेक स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.
