जिल्हा बँकेचे बनावट शिक्के बनवून केली बनावट चलने; सेवक निलंबित
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन अधिकार्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना नुकतीच मोठी कारवाई केली होती. आता याच बांधकाम विभागातील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका सेवकाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बनावट शिक्के वापरून कंत्राटदाराला बनावट चलने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कंत्राटदाराने बँकेत चौकशी केल्यावर उघडकीस आला.
याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद विस्तारीत कक्षातील कनिष्ठ व्यवस्थापक रणजित उल्हासराव ठाकुर (वय ४६, रा. विश्रांतवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या सेवक सचिन तुकाराम बाठे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषदेने सचिन बाठे याला निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही बनावट चलने तयार केली आहेत का, याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बँकेच्या जिल्हा परिषद विस्तारीत कक्षात काम करतात. कंत्राटदार विशाल रणनवरे हे २१ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी बँकेसाठी असलेली १०,००० व ५९० रुपयांची दोन चलने नजरचुकीने ठाकूर यांच्याकडे आली का, हे तपासण्याची विनंती केली. कॅशियर अनिल नाईक यांनी नगदी रजिस्टर तपासला असता, संबंधित चलनांची नोंद नसल्याचे लक्षात आले.
रणनवरे यांच्या चलनाची बारकाईने तपासणी केली असता, त्या चलनांवर बँकेचा अधिकृत शिक्का नसून बनावट शिक्का मारलेला असल्याचे दिसून आले. तसेच त्या चलनावर कॅशिअरची सहीही नव्हती.
यानंतर त्यांनी याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम अधिकारी गुंजेगावकर यांना दिली. त्यांनी रणनवरे यांना कार्यालयात बोलावून विचारणा केली असता, ही चलने जिल्हा परिषदेचे सेवक सचिन तुकाराम बाठे यांनी बनविल्याचे सांगण्यात आले.
फिर्यादी ठाकूर यांनी बाठे याला बँकेत बोलावून विचारणा केली असता, त्यानेही ही चलने बनावट शिक्के वापरून तयार केल्याचे कबूल केले. सचिन बाठे याने बँकेचे बनावट शिक्के वापरून कंत्राटदार विशाल रणनवरे यांना १०,००० व ५९० रुपयांची दोन बनावट चलने तयार करून दिली.
त्यानंतर बँकेत पैसे न भरता बँकेची फसवणूक केली, अशी फिर्याद बँकेच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करत आहेत
